
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळमार्गे मुंबईकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासह कसारा स्थानकातील अप यार्ड मार्गाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून कसारा येथे ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान तब्बल १२ दिवस विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम भुसावळ विभागातून मुंबईकडे तसेच मुंबईहून भुसावळमार्गे धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.
एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असून काही दिवसांवर नवरात्रोत्सव सण येऊन ठेपला आहे. यातच रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कामामुळे ब्लॉक घेतला जात असून यामुळे गाड्यांवर परिणाम होत आहे. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ या वेळेत, तर ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० या वेळेत ब्लॉक असेल. त्यामुळे ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव-कसारादरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाही.काही गाडचा ३० मिनिटांपासून सव्वा तासापर्यंत नियंत्रित (स्थानकांवर थांबवून ठेवणे) करण्यात येणार असून काही गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे.
भुसावळ विभागातील ‘या’ गाड्यांवर परिणाम
७ ऑक्टोबर रोजी १२१७२ हरिद्वार-एलटीटी वातानुकूलित एक्स्प्रेस आणि १२१०८ सीतापूर-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्यांना भुसावळ विभागात सव्वा तासापर्यंत नियंत्रित केले जाणार आहे.
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी १२८६० हावडा-सीएसएमटी गीतांजली एक्स्प्रेस आणि १७६१८ नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेसवरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे.
९ ऑक्टोबर रोजी १८०३० शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, १२८१० हावडा-सीएसएमटी मेल आणि १२१३२ साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस या गाड्यांना भुसावळ विभागात नियंत्रित केले जाणार आहे.
या गाड्यांनाही विलंबाची शक्यता
७ ऑक्टोबर रोजी कामायनी एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, जयनगर-एलटीटी एक्स्प्रेस, पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस, एलटीटी-सीतापूर एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस आणि – एलटीटी-धनबाद एक्स्प्रेसला वाहतूक नियंत्रणामुळे विलंब होऊ शकतो.
८ ऑक्टोबर रोजी एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-राणी कमलापती आणि एलटीटी-छपरा अंत्योदय एक्स्प्रेसवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ७व ८ ऑक्टोबर रोजी सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम, सीएसएमटी-बल्हारशाह नंदीग्राम आणि सीएसएमटी-हावडा दुरांतो एक्स्प्रेसला विलंब होऊ शकतो.
८ व ९ ऑक्टोबर रोजी गोरखपूर-एलटीटी सुपरफास्ट, बल्हारशाह-सीएसएमटी नंदीग्राम, प्रतापगड-एलटीटी उद्योगनगरी, गया-एलटीटी सुपरफास्ट आणि अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेसच्या वेळेवरही परिणाम होणार आहे.
त्यामुळे या कालावधीत मुंबईकडे किंवा मुंबईहून भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.





