जळगाव लाईव्ह न्यूज । सणासुदीचा काळ जवळ येताच गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे तिकीट बुकिंगसाठी धावपळ सुरू होते. नवरात्र, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होत असल्याने कन्फर्म तिकीट मिळवणे प्रवाशांसाठी मोठे आव्हान ठरते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने विविध मार्गांवर तब्बल ४१८ उत्सव विशेष गाड्या (Festive Special Trains) चालवण्याची घोषणा केली आहे. यातील अनेक गाड्या जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणार असून त्यामुळे सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

सीएसएमटी-नागपूर सुपरफास्ट
मुंबई सीएसएमटी–नागपूर–मुंबई सीएसएमटी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०२१३९/०२१४० च्या १२ फेऱ्या होतील. जळगाव, भुसावळ या स्थानकांवर थांबेल.

नागपूर मार्गावर आणखी १४ फेऱ्या
नागपूर–हडपसर–नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०१२०९/०१२१० च्या १४ फेऱ्याही चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१२१० हडपसरहून रविवारी सायंकाळी ४.०५ वाजता, तर ०१२०९ नागपूरहून शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता सुटेल.
मुंबई-मऊ विशेष गाडीच्या २४ फेऱ्या
लोकमान्य टिळक टर्मिनस–मऊ–लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०११२३/०११२४ च्या एकूण २४ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०११२३ ही ११ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दुपारी १२.१५ वाजता सुटेल. परतीची गाडी क्रमांक ०११२४ ही १३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान रविवार व मंगळवारी मऊहून पहाटे ४.१५ वाजता सुटेल. जळगाव, भुसावळ स्थानकांवर या गाडीला थांबे असतील.
मुंबई-बनारस गाडीच्या २४ फेऱ्या
लोकमान्य टिळक टर्मिनस–बनारस–लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२ च्या २४ फेऱ्या होणार आहेत. जळगाव, भुसावळ येथे थांबे असतील.
हडपसर–गाझीपूर विशेष गाडी
हडपसर–गाझीपूर सिटी–हडपसर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०१४३१/०१४३२ च्या २४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१४३१ हडपसरहून निर्धारित वारांना सकाळी ६.५५ वाजता, तर ०१४३२ गाझीपूर सिटीहून पहाटे ४ वाजता सुटेल. जळगाव, भुसावळ येथे थांबे असतील.
नागपूर–हडपसरच्या २६ फेऱ्या
नागपूर–हडपसर–नागपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०१२०१/०१२०२ च्या तब्बल २६ फेऱ्या नियोजित आहेत. गाडी क्रमांक ०१२०२ हडपसरहून मंगळवार व शुक्रवार दुपारी ४.०५ वाजता, तर ०१२०१ नागपूरहून सोमवार व गुरुवारी सायंकाळी ७.४० वाजता सुटेल. जळगाव, भुसावळ येथे या गाडीला थांबे असतील.
मुंबई-गोरखपूर दैनिक विशेष गाडी
मुंबई सीएसएमटी–गोरखपूर–मुंबई सीएसएमटी विशेष गाडी क्रमांक ०१०७९/०१०८० च्या तब्बल ६४ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१०७९ सीएसएमटीहून दररोज रात्री १०.३० वाजता, तर ०१०८० गोरखपूरहून दररोज दुपारी २.३० वाजता सुटेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खलिलाबाद.
हडपसर-गोरखपूरच्या ६४ फेऱ्या
हडपसर–गोरखपूर–हडपसर दैनिक विशेष गाडी क्रमांक ०१४१५/०१४१६ च्या ६४ फेऱ्या होणार आहेत. भुसावळ येथे या गाडीला थांबा असेल.
अमरावती-पुणे विशेष गाडी
नवी अमरावती–पुणे–नवी अमरावती साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०१४०४/०१४०३ च्या १२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथे या गाडीला थांबे असतील.
आरक्षण कधी सुरू होणार?
विशेष गाडी क्रमांक ०११२३, ०१४३१, ०१२०१, ०१२०२ आणि ०१०७९ यांचे आरक्षण २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर ०१२०९, ०१२१०, ०२१३९, ०२१४०, ०१४१५, ०१४०३, ०१४०४ आणि ०१०५१ या विशेष गाड्यांचे आरक्षण २८ सप्टेंबरपासून सुरू होईल. प्रवाशांना सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर आरक्षण करता येणार आहे. रेलवन ॲपद्वारेही तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.







