
जळगाव लाईव्ह न्यूज । वाहनधारकांना झटका देणारी बातमी आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उताराचा परिणाम आता देशातील इंधन दरांवरही दिसू लागला असून यातच नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ₹५, तर डिझेलच्या दरात ₹३ वाढ केली आहे.
ही दरवाढ आज म्हणजेच ३ ऑक्टोबरपासून तात्काळ लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर जळगावात नायरा एनर्जीने पेट्रोलचा दर प्रति लिटर ११६ रुपयावर गेला आहे. तर डिझेल ने देखील शंभरी ओलांडली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती वाढल्याने इंधन विक्रीवरील कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किंमती आणि देशांतर्गत किरकोळ विक्री दरातील तफावत कमी करण्याच्या उद्देशाने नायरा एनर्जीने दरवाढ केल्याचे वृत्त आहे.
याआधी पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्यानंतर २६ मार्च २०२६ रोजी नायरा एनर्जीने पेट्रोल ₹५ आणि डिझेल ₹३ प्रति लिटर महाग केले होते. त्यावेळी कंपनीने वाढलेल्या आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमतीचा काही भार ग्राहकांवर टाकला होता. मात्र, त्यानंतर जागतिक कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने १ जुलै रोजी नायरा एनर्जीने पेट्रोल ₹५ आणि डिझेल ₹३ प्रति लिटरने स्वस्त केले होते. त्यामुळे मार्चमधील वाढ कंपनीने मागे घेतली होती.
आता जागतिक बाजारात कच्च्या तेलासह रिफाइंड इंधनाच्या किंमतीत पुन्हा वाढ होत असल्याने नायरा एनर्जीने दरांमध्ये बदल केला आहे. नायरा देशभरातील ७ हजारांहून अधिक पेट्रोल पंपांचे संचालन करते. स्थानिक करांमुळे प्रत्यक्ष पेट्रोल-डिझेल दर राज्यनिहाय वेगळे असू शकतात.





