⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

UP Budget 2022 : योगी सरकारचे अल्पसंख्यांक समाजासाठी बंपर पॅकेज, मदरशांसाठी ४७९ कोटींची तरतूद

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । देशातील सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तरप्रदेशच्या योगी सरकारचा दुसरा कार्यकाळ नुकतेच सुरु झाला आहे. दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी अर्थसंकल्प सादर करतांना केलेल्या घोषणेत अल्पसंख्यांक समाजासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. योगी सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी बंपर पॅकेज जाहीर केले असून मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल 479.07 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारचा दुसरा कार्यकाळ नुकतेच सुरु झाला आहे. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असून त्यांच्या मंत्रिमंडळातील पहिला अर्थसंकल्प गुरुवारी अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सादर केला, ज्यामध्ये अल्पसंख्याकांना लक्षात घेऊन काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. योगी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून महिला, शेतकरी, वृद्ध, तरुण, साधू संत यांच्यासाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. योगी सरकारने अल्पसंख्यांक समाजाला समोर ठेवत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या असून विविध विषयांसाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या आहेत.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुरेश खन्ना म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी पूर्वादासम शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2022-2023 या आर्थिक वर्षात 600 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. तसेच दशमोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी 195 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. एकंदरीत दोन्ही शिष्यवृत्ती योजना गृहीत धरता योगी सरकारने तब्बल 795.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच योगी सरकारने अरबी पर्शियन मदरशांच्या आधुनिकीकरणाच्या योजनेसाठी 479 कोटी 07 लाखांची तरतूद केली आहे. बहुक्षेत्रीय जिल्हा योजनेच्या विविध घटकांतर्गत अल्पसंख्याक लोकसंख्या असलेल्या भागात पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि पेयजल योजनांच्या विकासासाठी एकूण 508 कोटी 18 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. योगी सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी मोठी तरतूद केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.