⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

दुर्दैवी : उपासमारीने बिबट्याच्या दोन बछड्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे परिसरात बिबट्याच्या दाेन बछड्यांचाही मृत्यू झाला असून कुजलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले आहेत. महिन्याभरापूर्वी या बछड्यांची आई मादी बिबट्या याच परिसरात विहिरीत मृत स्थितीत आढळली हाेती. तेव्हापासून आईला पारखे झालेल्या या बछड्यांचा याच परिसरात वावर हाेता. मात्र, या बछड्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे जरी अजून स्पष्ट झाले नसले तरी उपासमारीने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. शवविच्छेदनानंतरच येथील वन कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वडगाव लांबे शिवारातील प्रकाश नीळकंठ पाटील यांच्या चाळीसगाव-धुळे महामार्गालगत असलेल्या शेतात ऊसतोड सुरू असताना ७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी बिबट्याचे दोन बछडे दिसून आले होते. त्यानंतर मादी बिबट्या ‘त्या’ बछड्यांना घेऊन गेल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. तेव्हापासून या तिघांचा या परिसरात वावर असल्याने वन विभागाने सावधानतेचा इशारा दिला होता.

मादी बिबट्याचा विहिरीत मृत्यू

त्यानंतर आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधण्यासाठी भटकंती करणाऱ्या मादी बिबटा विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. हा मादी बिबटा कुजलेल्या अवस्थेत विहिरीत मृतस्थितीत आढळल्याने त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हे समजून आले नव्हते. बछड्यांचाही दुर्दैवी अंतत्यानंतर वडगाव लांबे शिवारात ७ फेब्रुवारी रोजी प्रकाश पाटील यांच्या शेत बांधावर झुडपात बिबट्याचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. तीन महिन्याचे व असलेले एक मादी व एक नर असे हे बछडे होते. कुजलेल्या अवस्थेमुळे शेतकऱ्यांना दुर्गंधी जाणवल्याने त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघे मृत बछडे ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप भट यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वन विभागाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहाय्यक वन संरक्षक सुदर्शन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व कर्मचारी उपस्थित होते.

मृत्यू नेमका कशामुळे हे सांगता येणार नाही

आमच्याकडे बिबट्याचे दोन बछडे मृत आढळल्याची माहिती आली हाेती. ते कुजलेल्या स्थितीत होते. त्यामुळे या बछड्यांचा तीन ते चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगता येणार नाही. असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप भट यांनी मत व्यक्त केले.