⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

लग्नाच्या बहाण्याने वधुसह दलालाने अडीच लाखात गंडविले, दोघे पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील डांंमरून येथील रहिवासी असलेल्या तरुणाला लग्नाचे आमिष दाखवत अडीच लाखांचा चुना लावण्यात आला होता. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दाखल या गुन्ह्यात पोलिसांनी शिताफीने नववधू आणि दलालाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील डांमरूण येथील घनश्याम मुरलीधर पाटील याला लग्नाचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करून लग्नासाठी, तोतया वधु आशा संतोष शिंदे (३१) रा. सुंदरवाडी, चिकलठाणा, जिल्हा औरंगाबाद व एजंट किरण भास्कर पाटील(४५) उर्फ बापू पाटील राहणार आमडदे तालुका भडगाव यांनी कट रचुन जाळ्यात अडकवले होते. दोघांनी घनश्याम पाटील यांच्याकडून २ लाख रुपये व ४० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने घेतले होते, परंतु लग्न लावण्यापूर्वी दोघांनी ऐवज घेवुन पोबारा केला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला घनश्याम मुरलीधर पाटील यांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार हवालदार विजय महादू शिंदे यांनी गुन्ह्याचा यशस्वी तपास करत तोतया वधू व एजंट दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दिनांक ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांनी अजून किती जणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे, याचा तपास सुरू आहे.