जळगाव लाईव्ह न्यूज । पंढरपूर वारी करून परतणाऱ्या यावल तालुक्यातील सावखेडासीम येथील एका भाविक महिलेचा एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंजनाबाई रामलाल पाटील (वय ६५) असे मृत महिलेचे नाव असून, ही दुर्घटना २३ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडासीम गावातील सुमारे ६० भाविक यावल आगाराच्या एसटी बसने पंढरपूर दर्शनासाठी गेले होते. पंढरपूर दर्शनानंतर काही भाविक गाणगापूर आणि अक्कलकोट येथे दर्शनासाठी रवाना झाले होते. अंजनाबाई पाटील यांनी गाणगापूर आणि तुळजापूर येथे दर्शन घेऊन त्या रिक्षाने पंढरपूरच्या मार्गे प्रवास करत होत्या.

दरम्यान, मोहोळ येथे रात्रीच्या सुमारास रिक्षातून उतरून रस्ता ओलांडत असताना महामंडळाच्या एमएच-१४-एनई-७१६० क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर मोहोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर २४ जुलै रोजी मृतदेह सावखेडासीम येथे आणण्यात आला. त्यांनतर दुपारी गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंजनाबाई पाटील यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने सावखेडासीम गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.











