जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । जस्टीस उदय उमेश लळीत भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश होणार आहेत. एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ येत्या २६ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यानंतर रमणा यांनी लळीत हे आपले उत्तराधिकारी असतील, अशी शिफारस केली होती.

न्यायमूर्ती उदय उमेश लळीत म्हणजेच यू. यू. लळीत सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील. लळीत यांच्या नियुक्तीने कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.प्रस्थापित नियमानुसार, मावळत्या सरन्यायाधीशांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांच्या नावाची शिफारस करावी लागते. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे ज्येष्ठतेच्या क्रमवारीत न्यायमूर्ती रमणा यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम न करणारे उदय लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील. वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या आधी देशाचे १३ वे सरन्यायाधीश एसएम सिक्री यांनी १९७१ मध्ये ही कामगिरी केली होती. उदय लळीत हे आपल्या सौम्य स्वभावासाठी ओळखले जातात. महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय परिस्थिती निर्माण झाली असताना उदय लळीत यांचे सरन्यायाधीशपदी विराजमान होणे, हा एक अनोखा योगायोग मानला जात आहे. पण उदय लळीतही फार दिवस सरन्यायाधीश राहू शकणार नाहीत. त्यांचा कार्यकाळ अवघ्या ७४ दिवसांचा असेल. सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यास उदय लळीत ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.












