जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२५ । काल शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून १२ व्या वेळी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी दिवाळीत देशवासीयांना दुहेरी भेट मिळेल असं म्हटलं. म्हणजेच दिवाळीत आपण जीएसटीमध्ये मोठी सुधारणा करणार असल्याचं म्हटलं आहे.

त्यामुळे जीएसटीचे स्लॅब पुन्हा नव्याने तयार करण्यात येणार असल्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी होतील आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मानले जाते. दरम्यान, नव्या रचनेनुसार, जीएसटीमधील १२ आणि २८ टक्के स्लॅब रद्द करून फक्त ५ आणि १८ टक्के स्लॅबची करआकारणी करण्याची शक्यता आहे. तसेच आलिशान मोटारींसारख्या आणि तंबाखुसारख्या म्हणजेच (सीन गुड्स)वर ४० टक्के दर लागू होण्याची शक्यता आहे.

सध्या ० टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ आणि २८ टक्के असे स्लॅब आहेत. आता काही स्लॅब एकत्र करून फक्त दोन दर ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान जीएसटीच्या सध्याच्या १२ टक्के कर स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या ९९ टक्के वस्तू सुधारित जीएसटी प्रणालीमध्ये ५ टक्के स्लॅबमध्ये टाकल्या जातील. त्याचप्रमाणे, २८ टक्के दर श्रेणीमध्ये येणाऱ्या सुमारे ९० टक्के वस्तू सुधारित जीएसटी प्रणालीमध्ये १८ टक्के कर स्लॅबमध्ये टाकल्या जातील. यावेळी तयार होत असलेल्या जीएसटी सुधारणांचा थेट फायदा सर्वसामान्यांना होईल.
काय स्वस्त होईल?
१२% ते ५% कराखाली येणाऱ्या वस्तू: कंडेन्स्ड मिल्क, ड्रायफ्रुट्स, फ्रोझन भाज्या, सॉसेज, पास्ता, जाम, नमकीन, टूथ पावडर, फीडिंग बॉटल, कार्पेट, छत्री, सायकली, भांडी, फर्निचर, पेन्सिल, ज्यूट किंवा कॉटन हँडबॅग्ज आणि १००० रुपयांपर्यंतच्या पादत्राणे.
२८% ते १८% कराखाली येणाऱ्या वस्तू: सिमेंट, एसी, डिशवॉशर, मॉनिटर, प्रोजेक्टर, सेट-टॉप बॉक्स आणि एलसीडी/एलईडी टीव्ही.
याचसोबत हेल्थ इन्श्युरन्सवरील जीएसटीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.
काय महाग होईल?
सरकारने काही उत्पादनांना “डिमेरिट आयटम” म्हणून मानले आहे. यामध्ये आलिशान मोटारी, सिगारेट आणि ऑनलाइन गेमिंगचा समावेश आहे. आता यावर ४०% कर लावला जाईल. याचा अर्थ त्यांच्या किमती आणखी वाढतील.












