जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । देशात मागील अनेक महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. अद्यापही एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागत आहे. दरम्यान, वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी संकेत दिले आहेत.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती जशा आहेत तशाच पुढच्या दोन ते तीन महिने राहिल्या तर इंधनाच्या दरात घट होऊ शकते. सरकारचा तेल आयात धोरणात मोठा बदल करण्याचे हे संकेत आहेत.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी सांगितले की, पुढील दोन-तीन महिने कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्या तर भारतात इंधनाच्या किंमती कमी करण्यास वाव आहे. भारत वेगवेगळ्या ठिकाणांवरुन तेलाची आयात करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तेल पुरवठा अधिक होईल. परिणामी इंधनाच्या किंमती कमी होतील, असं त्यांनी सांगितले.
हरदीप सिंग यांनी सांगितले की, भारताने आपले तेल आयात करण्याच्या क्षेत्रात विस्तार केला आहे. आता कच्च्या तेलाच्या पुरवठा करण्याच्या देशांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ४० देशांकडून तेल आयात केले जात आहे. तेल बाजारपेठेतील १६ टक्के वाढ ही भारतातून झाली आहे. पुढे ही वाढ २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.











