⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगावच्या खड्ड्यातून खडतर वाट, ट्रॅक्टर उलटले, दुचाकीस्वार बचावला!

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । जळगाव शहरातील खड्डे जळगावकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते टकाटक होणार असे म्हटले जात होते मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नियोजनाअभावी सर्वच रखडले. कालपासून पाऊस सुरू असून इच्छादेवी चौक ते डी मार्ट दरम्यानच्या रस्त्यावर आज सकाळी विटा वाहून नेत असलेली ट्रॉली खड्ड्यामुळे उलटली. ट्रॅक्टरच्या बाजूने चालत असलेला दुचाकीस्वार वेळीच बाजूला झाल्याने बचावला आहे.

शहरातील इच्छादेवी चौकातून डीमार्टकडे मंगळवारी सकाळी (एम.एच.१९ सी.झेड ०५७३ ) या क्रमांकांचे ट्रॅक्टर व (एमएच १९ सी १८०२) या क्रमाकांच्या ट्रॉलीसह जात होते. ट्रॉलीमध्ये वीटा भरलेल्या होत्या. तांबापुरा परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डयाचा अंदाज न आल्याने वीटांनी भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. यात सर्व वीटा रस्त्यावर पडल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान ट्रॅक्टरची ट्रॉली उलटत असतांना याच ठिकाणाहून काही चिमुकले जात होते. या ठिकाणी असलेले कुणाल बागुल, आशिफ शाह, जमील शेख, विकास फुलपागरे, गजानन सोनार, विजय परदेशी, दिलबर शेख, इरफान खान या नागरिकांनी चिमुकल्यांना वेळीच बाजूला केले. त्यामुळे दुर्घटना टळली. तसेच या नागरिकांनी यावेळी मदतकार्य केले.

रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालणे सुध्दा मुश्लील झाले., याठिकाणी रोज लहानमोठे अपघात होत असतात, मात्र तरीही महापालिकेकडून रस्त्याची दुरूस्ती केली जात नाही, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेने नागरिकांची जीवाशी न खेळता रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.