
जळगाव : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी आणि हवा प्रदूषण रोखण्यासाठी फटाके वाजवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून दिवाळी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.
फटाके वाजवण्यासाठी वेळेची मर्यादा
सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक ७२/१९९८ मधील २७ सप्टेंबर २००१ च्या अंतरिम आदेशानुसार, दिवाळीच्या काळात ध्वनी आणि हवा प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी फटाक्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, फटाके वाजवण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. रात्री १० नंतर ते सकाळी ६ वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार नाहीत.
रुग्णालये अन् शाळांजवळ फटाके वाजवण्यास मनाई
रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसराला शांतता क्षेत्र म्हणून निर्धारित करण्यात आले आहे. या क्षेत्रात कोणत्याही वेळी फटाके वाजवण्यास परवानगी नाही. त्यामुळे नागरिकांनी या परिसरातील शांतता राखून नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर निर्बंध
फटाका उडवण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यास बंदी आहे. तसेच साखळी फटाक्यांसाठी निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांनुसार प्रतिबंधित असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करता येणार नाही.
निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके किंवा नियमबाह्य साखळी फटाके आढळल्यास ते जप्त करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
ध्वनी आणि हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्यात येत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे कोणतेही अपघात घडू नयेत, यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, असेही सूचित करण्यात आले आहे.नागरिकांनी फटाके वाजवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. ध्वनी व हवा प्रदूषण टाळून दिवाळीचा आनंद सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.





