
धरणगावच्या सहकार क्षेत्रात उत्साह
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, धरणगाव तालुक्यातून युवा नेतृत्व तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या मैदानात दमदार प्रवेश केला आहे. त्यांच्या उमेदवारीला सहकार क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नेते आणि समर्थकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, धरणगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.अनुभवी नेत्यांची साथ आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाचा उत्साह यामुळे प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र असलेले प्रतापराव पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. युवा नेतृत्वाला सहकार क्षेत्रात संधी मिळावी, नव्या विचारांना वाव मिळावा आणि शेतकरी व सहकारी संस्थांच्या हिताला प्राधान्य मिळावे, अशा अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहेत. ज्येष्ठांच्या अनुभवाला युवा नेतृत्वाची जोड देणाऱ्या त्यांच्या उमेदवारीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शविला.
यावेळीदूध संघाचे संचालक रमेशअप्पा पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, उप जिल्हा प्रमुख शरद पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, अनिल भोळे, जितेंद्र पाटील, निंबाजीराव साहेबराव पाटील, वैशाली पाटील, प्रशांत झंवर, माजी सरपंच अरुण पाटील, दीपक भदाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उमेदवारी अर्जासाठी मीराबाई संजय पाटील यांनी सूचक म्हणून भूमिका बजावली. समर्थकांच्या उत्साहात प्रतापराव पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने आगामी निवडणुकीत धरणगाव तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.





