जळगाव जिल्हा

‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर प्रभाव ! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; जळगावातही..

जळगाव लाईव्ह न्यूज । बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळसह काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, या हवामान बदलाचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही दिसून येत असून, आज बुधवारी सकाळपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या भागांतील नागरिकांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाचा अंदाज

विदर्भाबरोबरच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. राज्यातील इतर काही भागांतही तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जळगावात ढगाळ वातावरण

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही हवामानात बदल जाणवत आहे. बुधवारी सकाळपासून जळगाव शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वाऱ्यांचा वेग ताशी सुमारे १५ किलोमीटर असल्याने रात्री आणि पहाटेच्या तापमानात घट जाणवत आहे. शहरातील किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे आज तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता असून काही प्रमाणात पावसाची हजेरीही लागू शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button