गुन्हेजळगाव जिल्हा

पाळधी बायपासवर पुन्हा अपघात! आयशरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरालगतच्या पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आणखी एका तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. योगेश गजमल राक्षे असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, बायपासवरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, जुलै महिन्यापासून आतापर्यंत झालेल्या २५ अपघातांत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

योगेश गजमल राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काम आटोपून दुचाकीने घरी जात असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

योगेश राक्षे यांचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नव्या संसाराला सुरुवात झालेली असतानाच अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बायपासवरील अपघातांची मालिका सुरूच

दरम्यान, ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर पाळधी-तरसोद बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी, अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली. त्यामुळे शहरातील तसेच पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जुलै महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावरील २५ अपघातांमध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आयशर चालक पोलिसांच्या ताब्यात

या अपघातप्रकरणी पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बायपासवरील अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button