जळगाव जिल्हा

खरे महानायक तुम्हीच आहात ! सचिन पिळगावकर यांचे दीपस्तंभच्या विद्यार्थ्यांप्रति गौरवोद्गार

कापूसकोंडा’ चित्रपटाचा २१० विद्यार्थ्यांनी घेतला आनंद; दीपस्तंभ मनोबलला आत्मचरित्राच्या रॉयल्टीतून सहकार्याची भावना

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल येथील २१० विद्यार्थ्यांना ‘कापूसकोंडा’ चित्रपट पाहण्याची विशेष संधी मिळाली. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी विद्यार्थ्यांसोबत चित्रपटाचा आनंद घेतला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन मोहिते, निर्माते अनिरुद्ध अंधोरीकर, दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, संचालक श्री. अनिल भोळे आणि डॉ. रुपेश पाटील उपस्थित होते.

चित्रपटातील मुक्या प्राण्याप्रती असलेले प्रेम, संवेदना आणि भावनिक नात्याने विद्यार्थी भारावून गेले. अंध विद्यार्थ्यांना चित्रपटातील प्रसंग समजावून सांगण्याची, तर कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

दीपस्तंभच्या कार्याचे कौतुक; विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद

सचिन पिळगावकर यांनी दीपस्तंभ फाऊंडेशनला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका अंध विद्यार्थिनीने सादर केलेल्या सुरेल गीताने उपस्थितांची मने जिंकली.दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलात्मक वस्तू देऊन सचिन पिळगावकर यांचा सत्कार यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना भेटून झालेला आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, अशी भावना सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली.

आपल्या हिंदी व इंग्लिश आत्मचरित्राचे लेखन पुढील वर्षभरात पूर्ण होईल, तसेच त्याच्या रॉयल्टीतून दीपस्तंभ मनोबलला सहकार्य मिळेल आणि आपल्या हयातीनंतरही हे सहकार्य सुरू राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

संवेदनशीलतेचे मंदिर असलेल्या दीपस्तंभला सहकार्याचा गौरवपूर्ण संदर्भ

यावेळी सचिन पिळगावकर यांनी ‘ कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून मिळालेली संपूर्ण रक्कम दीपस्तंभ फाऊंडेशनसाठी समर्पित केली. हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारणारी ही संस्था खऱ्या अर्थाने ‘संवेदनशीलतेचे मंदिर’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“मी स्वतःला महानायक समजत नाही. मला लाखो लोकांचे प्रेम मिळाले आहे. खरे महानायक तुम्ही सर्व आहात. असंख्य आव्हानांवर मात करत तुम्ही स्वतःची जडणघडण करत आहात,” या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा गौरव केला. कला, संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशकतेचा संगम ठरलेला हा उपक्रम दीपस्तंभच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button