
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि दुष्काळ निवारणाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित एसएसबीटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या प्रथम चेअरमन आणि भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, २० डिसेंबर २०२६ रोजी जळगावात ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जलगाव रन्स फॉर फार्मर्स’ ही या स्पर्धेची संकल्पना असून, स्पर्धेतून प्राप्त होणारा निधी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीस मदत म्हणून देण्यात येणार आहे.
जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावर ही स्पर्धा होणार असून, जळगाव शहर, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना यात सहभागी होता येणार आहे. धावण्याची आवड असणाऱ्या नागरिकांसह फिटनेसप्रेमी आणि नवोदित धावपटूंनाही या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचे आयोजन २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार गटांत करण्यात आले आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे.
२१ किमीच्या विजेत्याला ११ हजारांचे बक्षीस
२१ किलोमीटर आणि १० किलोमीटर या दोन्ही गटांमध्ये विजेत्यांसाठी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासोबतच मानपत्र आणि बोधचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येईल.
महिला आणि पुरुषांसाठी पुरस्कारांच्या स्वतंत्र श्रेणी असणार आहेत. याशिवाय ३, ५, १० आणि २१ किलोमीटर या चारही गटांतील सहभागी स्पर्धकांमधून दहा लकी ड्रॉ विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
स्पर्धेची वेळ काय?
स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
२१ किलोमीटर: सकाळी ६ वाजता
१० किलोमीटर: सकाळी ६.३० वाजता
५ किलोमीटर: सकाळी ७ वाजता
३ किलोमीटर: सकाळी ७.३० वाजता
सर्व स्पर्धांची सुरुवात खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावरून होईल.
आरएफआयडी प्रणालीद्वारे वेळेची नोंद
२१ किलोमीटर आणि १० किलोमीटरच्या स्पर्धांसाठी आरएफआयडी (RFID) प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धा वेळेच्या नोंदीवर आधारित असतील. धावपटूंनी मार्गावरील निर्धारित स्कॅनिंग केंद्रे पार केल्यानंतर त्यांच्या धावण्याची नोंद प्रणालीमध्ये होईल. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर धावपटूला त्याने धाव पूर्ण केल्याची आणि त्यासाठी लागलेल्या वेळेची माहिती मोबाईलवर संदेशाद्वारे मिळणार आहे.
स्पर्धेसाठी किती शुल्क?
स्पर्धेच्या विविध गटांसाठी पुढीलप्रमाणे नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
३ किलोमीटर: ३५० रुपये
५ किलोमीटर: ५०० रुपये
१० किलोमीटर: ७०० रुपये
२१ किलोमीटर: ९०० रुपये
एसएसबीटी संस्थेच्या विद्यार्थ्यांना सर्व गटांत नोंदणी शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्याही गटात केवळ १०० रुपये शुल्क भरून सहभागी होता येणार आहे.
टी-शर्ट, पदक, प्रमाणपत्र आणि नाश्त्याची व्यवस्था
नोंदणी शुल्कामध्ये सहभागी स्पर्धकांसाठी विविध सुविधांचा समावेश आहे. आयोजकांकडून स्पर्धेच्या आदल्या दिवशी विशेष तयार केलेला रनिंग टी-शर्ट देण्यात येणार आहे. धाव पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच स्पर्धेनंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
धावण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्किटे, चॉकलेट, निमगोळी, एनर्जल, लिंबूपाणी आणि हायड्रेशन सपोर्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय सेवाही पुरविण्यात येणार आहेत.
धावण्याचे मार्ग
२१ किलोमीटरचा मार्ग : खानदेश सेंट्रल मैदान, कोर्ट चौक, रिंग रोड, जेडीसीसी बँक, बहिणाबाई गार्डन, आकाशवाणी चौक, सिंधी कॉलनी, पांडे चौक, नेरी नाका, टॉवर चौक, रेल्वे उड्डाणपूल, शिवाजीनगर रोड आणि जळगाव दूध फेडरेशन केंद्र असा मार्ग असेल. दूध फेडरेशन केंद्रावरून वळसा घेऊन रेल्वे उड्डाणपूल, टॉवर चौक आणि नेहरू चौक मार्गे स्पर्धक पुन्हा खानदेश सेंट्रलच्या मैदानावर परततील. हा मार्ग स्पर्धकांना दोन वेळा पूर्ण करावा लागणार आहे.
१० किलोमीटरचा मार्ग : खानदेश सेंट्रल मैदान, कोर्ट चौक, रिंग रोड, जेडीसीसी बँक, बहिणाबाई गार्डन, आकाशवाणी चौक, सिंधी कॉलनी, पांडे चौक, नेरी नाका, टॉवर चौक, रेल्वे उड्डाणपूल, शिवाजीनगर रोड आणि जळगाव दूध फेडरेशन केंद्र असा मार्ग राहील. येथून वळसा घेऊन रेल्वे उड्डाणपूल, टॉवर चौक आणि नेहरू चौक मार्गे स्पर्धक पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचतील.
५ किलोमीटरचा मार्ग : खानदेश सेंट्रल मैदान, कोर्ट चौक, रिंग रोड, जेडीसीसी बँक, बहिणाबाई गार्डन आणि आकाशवाणी चौक येथून वळसा घेऊन त्याच मार्गाने खानदेश सेंट्रल मैदानावर परत.
३ किलोमीटरचा मार्ग : खानदेश सेंट्रल मैदान, कोर्ट चौक, रिंग रोड आणि जेडीसीसी बँक येथून यू-टर्न घेऊन त्याच मार्गाने पुन्हा खानदेश सेंट्रल मैदानावर परत.
झुंबा, वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगचीही सुविधा
स्पर्धेपूर्वी झुंबा टीमच्या माध्यमातून विशेष वॉर्मअप सत्र आयोजित केले जाणार आहे. धाव पूर्ण झाल्यानंतर स्पर्धकांसाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइजचे आयोजन करण्यात येईल. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असून, त्यानंतर स्पर्धक आणि पाहुण्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था असेल. या स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. एम. व्ही. रावलानी आणि डॉ. प्रदीप एम. सोलंकी काम पाहत आहेत. तर प्रा. प्रवीण पाटील आणि डॉ. दिनेश पुरी हे रेस डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.





