जळगाव जिल्हा

मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । हृदयाचे ठोके अत्यंत कमी होणे, चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि त्यानंतर बेशुद्धावस्था निर्माण होणे, ही लक्षणे गंभीर हृदयविकाराची धोक्याची घंटा ठरू शकतात. अशाच आपत्कालीन परिस्थितीत ५५ वर्षीय रुग्णाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन हृदयविकार तज्ज्ञांनी तातडीने तपासण्या करून परमनंट पेसमेकरची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे रुग्णाला जीवदान मिळाले असून, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या हृदयविकार तज्ज्ञांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, संबंधित ५५ वर्षीय रुग्णाला हृदयाचे ठोके कमी होणे, चक्कर येणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येणे असा त्रास जाणवत होता. प्रकृती अधिक बिघडल्याने रुग्ण बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झाला. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. अशा परिस्थितीत हृदयाचे ठोके पुरेशा प्रमाणात न पडल्यास मेंदूसह शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळ न दवडता योग्य निदान आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे होते.

र्सीजी, टूडी इको तपासणीनंतर तातडीने निर्णय
रुग्णालयातील हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या हृदयाची ईसीजी आणि टूडी इको तपासणी तातडीने करण्यात आली. तपासण्यांच्या निष्कर्षांच्या आधारे रुग्णाच्या हृदयाच्या ठोक्यांचे नियमन करण्यासाठी परमनंट पेसमेकर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली आणि डॉ. सिद्धेश्वर खांडे यांच्या टीमने आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पार पाडत परमनंट पेसमेकरची शस्त्रक्रिया यशस्वी केली.परमनंट पेसमेकर हे हृदयाचे ठोके आवश्यकतेपेक्षा कमी होत असताना त्यांचे नियमन करण्यास मदत करणारे उपकरण आहे. हृदयाच्या ठोक्यांमधील गंभीर अनियमितता असलेल्या निवडक रुग्णांसाठी हा उपचार जीवनरक्षक ठरू शकतो. या रुग्णाच्या बाबतीतही तातडीने निदान करून योग्य उपचार केल्यामुळे पुढील गंभीर धोका टाळण्यास मदत झाली.

हृदयाचे ठोके खूप कमी होणे, वारंवार चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा बेशुद्ध पडणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. अशा वेळी रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करून हृदयाची तपासणी करणे आवश्यक असते. काही रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी परमनंट पेसमेकरची गरज भासू शकते. या रुग्णाच्या बाबतीत वेळेवर तपासणी आणि तातडीने उपचार करणे महत्त्वाचे ठरले. त्यामुळे नागरिकांनी अशी लक्षणे दिसल्यास घरगुती उपायांवर वेळ न घालवता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button