⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अरे देवा, ‘या’ तालुक्यांना जाणवणार पाणी टंचाईचे चटके!

जळगाव लाईव्ह न्यूज : २ मार्च २०२३ : मार्च महिना नुकताच उजाडला आहे मात्र जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा जोर धरु लागला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरिस जळगाव शहरासह जिल्ह्याला तापमानाचे चटके बसू लागले आहे. तापमान वाढत असल्याने पाणी साठ्यांमधील पाणी झपाट्याने कमी होवू लागले आहे.

अशातच जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या पाणीपातळीत तब्बल १ मीटरपर्यंत घट झाल्याची माहिती भूजल विभागाकडील आकडेवारीवरुन समोर आली आहे. यामुळे एप्रिल-मे महिन्यात या चारही तालुक्यांमधील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके बसण्याची दाट शक्यता आहे.

जळगावमध्ये एप्रिल-मे महिन्यात ४५ अंशापर्यंत तापमानाचा पारा जातो. एप्रिल हिट व मे हिटच्या तडाख्यात अंगाची लाहीलाही होते. उन्हाळ्यातील दुसरे मोठं संकट म्हणजे, या दिवसांमध्ये जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागतात. काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येते. तापमान जास्त असल्याने पाणी साठे झपाट्याने आटतात व भुजल पातळीही कमी होते. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भुजल पातळीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे मागील पाच वर्षांची पाणीपातळीची सरासरी लक्षात घेऊन जिल्ह्यातील १५ तालुक्यांची पाणीपातळी मोजली जाते. मागील वर्षांत १३० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असले, तरी यंदा जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या पाणीपातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. यात भुसावळ, बोदवड, यावल आणि धरणगाव तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात भुसावळ, बोदवड, यावल आणि धरणगाव तालुक्यांत पाणीपातळीत ०.३६ ते ०.९७ अशी घट झाली आहे.

तालुकानिहाय पाणीपातळीची स्थिती

मुक्ताईनगर- ०.००, रावेर- ०.०९, भुसावळ- ०.५६, बोदवड- ०.९७, यावल- ०.९१, जामनेर- ०.१६, जळगाव- ०.२७, धरणगाव- ०.३६, एरंडोल- ०.८४, चोपडा- ०.७२, अमळनेर- १.०४, पारोळा- ०.०१, पाचोरा- ०.०४, भडगाव- ०.२६, चाळीसगाव- ०.२६ अशी पाणीपातळीची स्थिती आहे.