गोवंश कत्तलीवर यावल पोलिसांचा छापा; चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

ऑगस्ट 10, 2026 10:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल शहरातील डांगपुरा भागातील मन्यारवाडा येथे घराच्या तळघरात गोवंशाची कत्तल करताना चौघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. या कारवाईत पोलिसांनी ६५ किलो गोमांसासह कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले असून, तळघरात कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या चार गोवंश जनावरांची तसेच तीन म्हैसवर्गीय जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १३ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

yL

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना ८ ऑगस्ट रोजी पहाटे गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस व होमगार्डच्या पथकासह सकाळी सुमारे ६ वाजता यावल शहरातील डांगपुरा भागातील मन्यारवाडा येथे छापा टाकला. यावेळी सैय्यद रशीद निसार कुरेशी (४५), सैय्यद आसीफ सैय्यद निसार (३३), सैय्यद हफीज सैय्यद निसार कुरेशी (३५) आणि सैय्यद अन्सार सैय्यद निसार (५०), सर्व रा. डांगपुरा, मन्यारवाडा, यावल, हे घराच्या तळघरात गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ६५ किलो वजनाचे गोमांस, लोखंडी कुऱ्हाड, कोयता, सुरा, लाकडी कुंदा, वजनकाटा, वजनमापे तसेच काळ्या रंगाच्या पॉलीथीन पिशव्या असा मुद्देमाल जप्त केला. तसेच कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या २ जिवंत गायी व २ गोरे अशा चार गोवंश जनावरांची, तसेच ३ म्हैसवर्गीय जनावरांची सुटका करून पुढील संगोपनासाठी गोशाळेत दाखल करण्यात आले.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांनाही ८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांना ९ ऑगस्ट रोजी यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान आरोपी क्रमांक एक सैय्यद रशीद निसार कुरेशी याच्याविरुद्ध यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. सन २०२५ मध्ये यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गोमांस विक्रीसंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तसेच २८ मे २०२६ रोजी बकरी ईदच्या दिवशी त्याच घराच्या तळघरात कत्तलीच्या उद्देशाने आठ गोवंश जनावरे बांधून ठेवल्याप्रकरणी आरोपी क्रमांक १ ते ३ यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हाही न्यायप्रविष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अवघ्या दीड महिन्यात पुन्हा कारवाई

मागील गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात त्याच घटनास्थळी पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा घडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक एक सैय्यद रशीद निसार कुरेशी याने त्याचे भाऊ असलेल्या आरोपी क्रमांक २ ते ४ यांच्यासोबत संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी वारंवार प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२ हे संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सफौ/७०४ विजय पाचपोळे, पोहेकॉ/३०७० रोहिल गणेश, पोकॉ/३३९५ पुरुषोत्तम पाटील, पोकॉ/१८०३ अनिल साळुंखे, पोकॉ/२२६ हितेश बागुल, पोकॉ/ मोहन, चालक पोकॉ संतोष पाटील तसेच बंदोबस्त कामी हजर झालेले होमगार्ड विशाल बारी, मधुकर पारधे, विजय बढे, महेंद्र माळी, नितीन कोळी, रामचंद्र सपकाळे यांनी केलेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now