जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे चोरट्यांनी येथील बाजारपेठेतील तब्बल चार दुकाने फोडून ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्रीत चार दुकानांमध्ये चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामसवाडी येथे चोरट्यांनी मध्यरात्री बाजार पेठेतील ४ दुकाने फोडून त्यात एकूण ५५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. ही घटना रात्री २ ते ३ च्या दरम्यान घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या चोरीत योगेश कषी केंद्रातून ४८ हजार रूपये, सुरेश मेडिकल अँन्ड जनरल स्टोअर्स येथून ५ हजार रूपये चोरून नेले. संजय पाटील यांच्या पवन कोल्ड्रिंक्समध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
विशेष म्हणजे चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटरचे बोर्ड कटरने कापले असून याप्रकरणी योगेश सोमनाथ जगन्नाथ वाणी, सुरेश पाटील, संजय पाटील, अभिजित कुलकर्णी यांच्या तक्रारी वरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संजय पवार, राजू जाधव यांनी भेट देऊन तपासला गती देण्याच्या सूचना दिल्यात.