जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी नियतक्षेत्रालगतच्या शेतीशिवारातील केळी बागेत वाघ विश्रांती घेत असल्याचे मागील आठवड्यात दिसून आले होते. ही घटना ताजी असताना आज पुन्हा सुकळी शिवारातील एका केळीबागेत वाघाने रानडुकराची शिकार केल्याची घटना उघडीच आली. या घटनेने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील शेतकरी सुनिल बाविस्कर हे पहाटे सहाच्या दरम्यान शेतात गेले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच घटनेची माहीती वनपाल पी.टी. पाटील यांना कळवली प्रभारी वनक्षेत्रपाल आशुतोष बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.टी. पाटील यांनी वनकर्मचाऱ्यांना सुचना करुन ट्रॅप कॅमेरे घेऊन रवाना केले. घटनास्थळी एक भलामोठ्ठा रानडुकराला मानेजवळ मोठी जखम होवुन मृतावस्थेत पडलेला दिसून आला. वाघाची ओळख पटविण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. या घटनेमुळे शेतकरी धास्तावले असून केळीबागेतील शेतीकामे करण्यास मजुर टाळाटाळ करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संवेदनशील भाग असल्याने शेतीशिवारात नियमित गस्त वनविभागाकडुन घालणे आवश्यक असताना देखिल गस्ती घातली जात नसल्याने स्थानिकांची नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच वाढत्या तापमानामुळे सुकळी, दुई शिवारातील केळी बागा वाघांसाठी आश्रयस्थान बनल्या आहे. केळीबागांत असलेले रानडुक्करे आणि पुरेशा प्रमाणात असलेला थंडावा. यामुळे वाघांना मुबलक खाद्य तर मिळतेच शिवाय तीव्र उकाड्यापासून सरंक्षणसुद्धा मिळत आहे. मात्र, शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त असून भितीदायक वातावरण शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. वनक्षेत्रातच नैसर्गिकरीत्या थंडावा निर्माण करण्यासह वनहद्दीला तार कंपाऊंड अथवा खंदक खोदुन यावर काही प्रमाणात तरी आळा घातला जावु शकतो? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. तसेच वन्यप्राणी रानडुक्करांकडुन नेहमी होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे सौर ऊर्जेवरील झटका मशीन पुरविण्यात यावी अशी मागणी केली असून या मागण्या वनविभागाकडून कधी पुर्ण होणार याकडे लक्ष लागून आहे.