मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्याला झोडपले: जनजीवन विस्कळीत

जुलै 31, 2026 4:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२६ । मागील २४ तासांपासून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून बाजारपेठा, निवासी भाग आणि ग्रामीण परिसरात पावसाच्या पाण्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. जिल्हा प्रशासन, नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा विविध ठिकाणी युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवत आहेत.

jlpn

जळगावातील गांधी मार्केट जलमय; दुकानांमध्ये शिरले पाणी

जळगाव शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. गांधी मार्केट परिसरातील बेसमेंटमध्ये असलेल्या सर्व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दुकाने खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आली असून, काही व्यापारी आवश्यक ती काळजी घेत व्यवसाय सुरू ठेवत आहेत. संबंधित यंत्रणांकडून पाणी उपसण्याचे व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बोदवड आणि भुसावळमध्ये युद्धापातळीवर कामे

दरम्यान, बोदवड आणि भुसावळ येथेही पावसाचे पाणी साचलेल्या भागात नगरपालिकेच्या यंत्रणांनी तातडीने काम सुरू केले आहे. नाल्यांमधील अडथळे दूर करणे, कचरा हटविणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी मार्ग मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, पाणी साचलेल्या भागात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चाळीसगाव शहरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाचा फटका जुन्या नगरपालिकेच्या इमारतीलाही बसला. प्रभाग क्रमांक १२ मधील या इमारतीची गॅलरी आणि भिंतीचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा परिसरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

भडगाव तालुक्यातील मौजे बात्सर येथे पाण्याची पातळी वाढल्याने पाच लहान बालके आणि तीन महिला घरात अडकून पडल्या होत्या. माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत यशस्वी बचावकार्य केले. सर्व आठ जणांना सुखरूप बाहेर काढून गावात सुरक्षित निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच भडगावचे तहसीलदार घटनास्थळी उपस्थित होते.

यावल तालुक्यातही मुसळधार पावसाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. वड्री धरण, निंबा देवी धरण आणि मनू देवी धबधबा परिसरात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून मनू देवी धबधबा प्रवाहित झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देत धरण परिसर, धबधबा, नदी-नाले, पूल, वेगवान प्रवाह आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

मनुदेवी मंदिर बंद

मुसळधार पावसामुळे श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिराजवळील असणारा धबधब्याला महापूर आल्याने मंदिरा परिसरातील रस्ते ब्लॉक झाले आहेत तर जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे निर्देश मंदिर प्रशासनाने घेतले असून भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून हतनूर, गिरणा, अजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नद्यांना पूर आला आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now