महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे वातावरण ! पुढील ३ दिवस ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

सप्टेंबर 21, 2026 4:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नैर्ऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास अखेर सुरू झाला असून राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनने माघारीचा प्रवास सुरू केला आहे. यंदा नेहमीच्या तुलनेत दोन दिवस उशिराने मान्सून परतत आहे. दरवर्षी साधारण १७ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीला सुरुवात होते. मात्र, यंदा १९ सप्टेंबरपासून मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

rn 1

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली असतानाच बंगालच्या उपसागरात नव्या हवामान प्रणालीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. २१ सप्टेंबरपर्यंत या प्रणालीचे रूपांतर ‘अवदाबा’त होण्याची शक्यता असून, २२ सप्टेंबरपर्यंत ते ‘तीव्र अवदाबा’त रूपांतरित होऊ शकते. ही हवामान प्रणाली पुढे पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता असून, २३ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ती दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे वातावरण

बंगालच्या उपसागरातील या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पुन्हा पावसाची शक्यता वाढली आहे.

महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांचा पावसाचा अंदाज

२१ सप्टेंबरचा अंदाज: २१ सप्टेंबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

‘येलो अलर्ट’ असणारे जिल्हे: गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिक (घाटाचा भाग), अहिल्यानगर, पुणे (घाटाचा भाग), सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर.

इतर जिल्हे: ठाणे, रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

२२ सप्टेंबरचा अंदाज: २२ सप्टेंबरला पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे.

‘येलो अलर्ट’ असणारे जिल्हे: विदर्भातील सर्व जिल्हे (गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, यवतमाळ), तसेच नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर (घाटाचा परिसर) आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

इतर जिल्हे: नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये ढगाळ वातावरण राहून अतिशय तुरळक सरी पडू शकतात.

२३ सप्टेंबरचा अंदाज: २३ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरेल; मात्र दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहील, तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान मुख्यत्वे कोरडे किंवा ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now