जळगाव पोलिसांची धडक कारवाई! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 21, 2026 12:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने एकाच दिवशी तब्बल नऊ ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू वाहतूक, ऑनलाइन चक्री जुगार, कल्याण मटका आणि गावठी हातभट्टी दारू विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली.

ganapure 1

या कारवाईत १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ३ लाख ४७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालात टाटा ४०७ टेम्पो, अवैध वाळू, एलईडी टीव्ही, सीपीयू, संगणकीय साहित्य, रोख रक्कम आणि गावठी हातभट्टीच्या दारूचा समावेश आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे DySP नितीन गणापुरे यांनी विशेष पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश साळुंखे, अवेश आरिफ शेख, प्रणय सुरेश पवार आणि अमोल अशोक ठाकूर यांनी संबंधित पोलीस ठाण्यांच्या अंमलदारांना सोबत घेत शहरातील विविध भागांत कारवाया केल्या.

जिल्हापेठ हद्दीत अवैध वाळू वाहतूक पकडली

जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवकॉलनी ते आकाशवाणी चौक परिसरात अवैध वाळूची वाहतूक करणारा टाटा ४०७ टेम्पो पकडण्यात आला. या कारवाईत दीड ब्रास अवैध वाळू, टेम्पो आणि मोबाईल असा २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ऑनलाइन जुगार अन् मटका अड्ड्यांवर छापे

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा सोमानी मार्केट परिसरात दोन ठिकाणी ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवायांत अनुक्रमे १६ हजार २१० आणि १३ हजार ७०० रुपये, असा एकूण २९ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेहरुण परिसरात तीन कारवाया करण्यात आल्या. ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावरून ३२ हजार ८० रुपये, तर दोन मटका अड्ड्यांवरून अनुक्रमे ५ हजार आणि १ हजार १३० रुपये, असा एकूण ३८ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदू आण्णानगर बसस्टॉप परिसरात कल्याण मटका अड्ड्यावर कारवाई करून दोन आरोपींकडून ३ हजार ७०० रुपये आणि मटका साहित्य जप्त करण्यात आले.

हातभट्टी दारूविरोधातही कारवाई

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर हुडको परिसरात कारवाई करून ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे ३ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. तर शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई करत ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे ३ हजार ५०० रुपये किमतीची, जप्त करण्यात आली.

जिल्हापेठ, रामानंद नगर, एमआयडीसी, जळगाव तालुका, जळगाव शहर आणि शनिपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण नऊ स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now