⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

आईचा मृतदेह घरात तरी मुलाने दिला दहावीचा पेपर

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । घरात आईचा मृतदेह असताना दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पेपर संपल्यावर त्याने हंबरडा फोडून आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे सोमवारी ही घटना घडली.

तालुक्यातील तरवाडे येथील माजी सरपंच निर्मलाबाई राजीव सोनवणे (वय ४१) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. साेमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या घटनेने सोनवणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातच निर्मलाबाई यांचा मुलगा मंगेश याची दहावीची परिक्षा सुरू होती. मंगेशचे सर्व पेपर पूर्ण झाले होते. साेमवारी त्याचा शेवटचा भूगोल विषयाचा पेपर होता. त्यात आजारी आईचा मृत्यु झाल्याने त्याच्यावर आभाळच कोसळले. एकीकडे घरात आईचा मृतदेह तर दुसरीकडे महत्वाचा पेपर होता. अशा स्थितीत गावातील माजी पं.स. सदस्य रविंद्र चाैधरी, डॉ. रविंद्र मराठे, पाेलिस पाटील जीवन पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, नामदेव चांदे,विलास गवळी,दिनकर जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी या मंगेशला धीर देत पेपर देण्यासाठी त्याला तयार केले. आईच्या जाण्याचे आभाळएवढे दु:ख मंगेश साेनवणे या चिमुकल्याने उराशी बाळगून परिक्षा केंद्राचा रस्ता धरला तसेच धिराने परीक्षा दिली.

घरी परतताच त्याने हंबरडा फोडला

मंगेश परीक्षेहून आल्यानंतरच निर्मलाबाई सोनवणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत मंगेशने भूगोलचा पेपर सोडवला. त्यानंतर घरी परतताच त्याने हंबरडा फोडला. आईच्या पार्थिवाला भडाग्नी मंगेशनेच दिला. मृत निर्मलाबाई सोनवणे यांच्या पश्चात पती व तरवाडे ग्रामपंचायतीचे सरपंच राजीव सोनवणे व तसेच दोन मुले असा परिवार आहे.