यावल-सावखेडा मार्गावर धोकादायक फांद्या छाटा व फलक लावा; ॲड. देवकांत पाटलांची PWD कडे मागणी

जुलै 27, 2026 8:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा या महत्त्वाच्या सार्वजनिक मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची तातडीने छाटणी करण्यात यावी तसेच दिशादर्शक, वेगमर्यादा, धोकादायक वळण, शाळा परिसर व इतर आवश्यक वाहतूक सुरक्षा सूचना फलक उभारण्यात यावेत, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आणि विरावलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल कार्यालयात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून ते वरिष्ठ लिपिक विकास बी. जंजाळे यांनी स्वीकारले.

ddp

निवेदनात म्हटले आहे की, यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा मार्ग हा अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावर दररोज शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार तसेच हजारो नागरिक प्रवास करतात. मात्र रस्त्यालगतच्या झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः बस, ट्रक आणि इतर मोठ्या वाहनांमधील प्रवाशांना फांद्यांमुळे दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या पावसाळ्यात झाडांच्या फांद्या अधिक झुकल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून, कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याशिवाय संपूर्ण मार्गावर दिशादर्शक फलक, वेगमर्यादा फलक, धोकादायक वळणाची सूचना, शाळा परिसराची सूचना, गाव हद्द दर्शविणारे फलक, परावर्तित (रिफ्लेक्टिव्ह) सूचना फलक तसेच इतर आवश्यक रस्ता सुरक्षा चिन्हांचा अभाव असल्याने वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करावी.
आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत.
वेगमर्यादा दर्शविणारे फलक उभारावेत.
धोकादायक वळणांचे सूचना फलक बसवावेत.
शाळा परिसर दर्शविणारे सूचना फलक उभारावेत.
गाव हद्द व इतर आवश्यक वाहतूक सुरक्षा फलक बसवावेत.
अपघातप्रवण ठिकाणी परावर्तित सूचना फलक व रस्ता सुरक्षा चिन्हे उभारावीत.

या मागण्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सकारात्मक कार्यवाही करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या मागणीचे परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांनी स्वागत केले असून प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now