⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | बातम्या | भुतकाळातील चुका ठरणार महाविकास आघाडीची डोकंदुखी! वाचा सविस्तर

भुतकाळातील चुका ठरणार महाविकास आघाडीची डोकंदुखी! वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. जशीजशी निवडणूक जवळ येतेयं तसतसे राजकीय वातावरण तापत आहे. निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप व राजकीय चिखलफेक आलीच! नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय चिखलफेकीचा कळस महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र हा रेकॉर्ड आगामी विधानसभा निवडणुकीत तुटेल की काय? असे गढूळ वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ररस्त्यावर उतरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरवर जोडेमारो आंदोलन केले.

निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण व्हावे, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी आक्रमक धोरण स्विकारल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीने भाजपाला विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र महाविकास आघाडीचे हेच आक्रमक धोरण आता त्यांच्यावरच उलटते की काय ? असे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या दररोजच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजनाने त्यांच्या भुतकाळावर बोट ठेवले आहे.काँग्रेसने महाराष्ट्राच्या हिताला कधीही प्राधान्य दिले नाही आणि राज्यातील महान व्यक्तींचा अपमान केला आहे, असा प्रतिवार भाजपाने केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांसारख्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने विरोध केला आहे. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द वापरण्यात आले आहे.. काँग्रेसने मध्य प्रदेश आणि बागलकोटमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे हटवले असून मंगळुरूमध्ये त्यांच्या विरोधात भुमिका घेतली आहे. शिवाय, यापूर्वी मुंबई महाराष्ट्राला देण्यासही पक्षाने विरोध केला होता, असे जुने विषय उकरुन काढत भाजपाने काँग्रेसची चांगलीच कोंडी केली आहे.

शरद पवार यांनी शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला विरोध केला आहे. राजकारणात इतके वर्ष झाल्यानंतर त्यांना आता रायगडावर जाण्याची बुध्दी सुचली, हे त्यांचे सोईचे राजकारण नाही का? तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या विचारांचा स्वीकार केला आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आणि महाराष्ट्राच्या तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने अमरावती आणि दर्यापूरमध्ये त्यांचे पुतळे हटवले. कर्नाटकात काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले असून संजय राऊत यांनी त्यांच्या वंशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशावळीवर प्रश्न उपस्थित करत अपमानास्पद वक्तव्य केले आहे, अशा फैरी भाजपाने झाडल्या आहेत.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते, हे महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. त्यांनी संभाजीराजे यांच्या वंशावळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांची डीएनए टेस्ट करावी, असे विधान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांवरील बेकायदेशीर अतिक्रमणांना आश्रय देण्याचा आणि वक्फ बोर्डाकडून मोठ्या प्रमाणावर जमीन हडप करण्यास समर्थन केल्याचा आरोप आहे. मराठा साम्राज्याचा शत्रू असलेल्या औरंगजेबलाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली, हे महाराष्ट्र अद्यापही विसरलेला नाही. जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब आणि अफझलखानाची प्रशंसा केली आणि दावा केला की शिवाजी महाराज त्यांच्यामुळेच महान होते, हा महाराजांचा अपमान नाही का? असा सवाल भाजपाने केला आहे.

उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेब आणि मुघलांचे कौतुक करताना म्हटले की त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला नाही. मुघलांपासून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा हा अनादर होता. या पार्श्वभूमीवर प्रश्न निर्माण होतो की, महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खरचं इतकी खाली घसरली आहे का? स्वत:चे राजकारणाचे दुकान चालविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो, हे मराठी माणसाला न पटणारे आहे. महाविकास आघाडीने भाजपा व महायुतीवर टीका जरुर करावी मात्र त्यासाठी छत्रपतींचा अशा प्रकारे अपमान करु नये, एवढीच माफक अपेक्षा आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.