जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जळगावातील बंड अखेर शमले आहे. त्यामुळे जळगावात महायुतीचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. रेश्मा काळे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

रेश्मा काळे यांनी सुरुवातीला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत रंगत आणली होती. मात्र, मुंबईत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासोबत सरिता माळी-कोल्हे आणि कुंदन काळे उपस्थित होते.

दरम्यान, जळगावातील राजकीय समीकरणांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका देखील चर्चेत आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अपक्ष उमेदवाराशी कोणताही संपर्क नसल्याचे स्पष्ट करत, “शरद तायडे यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत,” असे सांगितले.
तसेच, महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून रेश्मा काळे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावण्यात आल्याचेही समोर आले. या बैठकीनंतर त्यांनी माघार घेतल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद मिटल्याचे मानले जात आहे.या घडामोडींमुळे विधानपरिषद निवडणुकीत जळगावातील महायुतीचा विजयाचा मार्ग अधिक मोकळा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.










