भीषण दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला; भाविकांची पिकअप विहिरीत कोसळली; लहान मुलांसह १४ जणांचा मृत्यू

जून 14, 2026 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

solapuraccident

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. यावेळी तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सदर विहीर पाण्याने पूर्ण भरलेली होती. तसेच विहिरीभोवती कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने वाहन थेट पाण्यात गेल्याचे सांगितले जात आहे. या भीषण दुर्घटनेत 14 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि चार लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री यांनी दिली आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे रांजणी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now