जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव (Jalgaon) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. महायुतीकडून भाजपचे (BJP) नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (Shiv Sena) (ठाकरे गट) पक्षाचे शरद तायडे (Sharad Tayde) यांच्यात मुख्य लढत होईल असा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र, प्रहार संघटनेचे नेते अनिल चौधरी (Anil chaudhary) यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकल्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. अनिल चौधरी यांचा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींशी असलेला दांडगा संपर्क आणि वैयक्तिक हितसंबंधांमुळे ते महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर सर्वात तगडे आव्हान उभे करू शकतात, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार नव्हे, तर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी मतदान करत असतात. अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायती आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींची मोठी जमवाजमव करून आपली ताकद दाखवून दिली होती. भुसावळ आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चौधरी कुटुंबाचा असलेला वैयक्तिक प्रभाव आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळे अनेक नाराज लोकप्रतिनिधी छुपेपणाने चौधरी यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना (शिंदे गट) च्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतली असली तरी प्रहारचे अनिल चौधरी यांनी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मैदान सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
जळगाव विधान परिषदेचा इतिहास पाहिला तर येथे पक्षाच्या अधिकृत उमेदवारापेक्षा स्थानिक पातळीवरील वैयक्तिक हितसंबंध आणि छुपी गणिते नेहमीच वरचढ ठरली आहेत. २०१० च्या निवडणुकीतही तत्कालीन अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी दिग्गज नेत्यांच्या उमेदवारांना धूळ चारत विजय मिळवला होता. सध्याची परिस्थिती पाहता, अनिल चौधरी यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीत मोर्चेबांधणी केली आहे, ती पाहता ते महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा खेळ बिघडवू शकतात.
महाविकास आघाडीचे शरद तायडे रिंगणात असल्यामुळे ही लढत तिरंगी झाली असली, तरी खरी लढत आणि सर्वाधिक चर्चा अपक्ष अनिल चौधरी यांच्याच नावाभोवती फिरत आहे. आता या चुरशीच्या लढतीत अनिल चौधरी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर बाजी मारतात की महायुती आपली सत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.









