जळगाव लाईव्ह न्यूज । अलीकडेच भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या दृष्टीने अनेक महत्वाचे बदल केले असून यात तिकीट बुकिंगचाही समावेश आहे. याच दरम्यान आता रेल्वे एक मोठा बदल करणार आहे. या बदलानंतर प्रवाशांना कन्फर्म रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नव्हे तर तिकीटाची तारीख बदलल्यावर कोणतेही कॅन्सलेशन चार्जेसही भरावे लागणार नाहीत.

याआधी असं नव्हतं. पूर्वी, प्रवाशांना त्यांची तिकिटं रद्द करावी लागायची आणि नवीन तारखेसाठी पुन्हा बुकिंग करावे लागत होते, ज्यामध्ये कॅन्सलेशन चार्जेसही लागायचे तसेच कन्फर्म सीटची कोणतीही हमी नव्हती. मात्र आता, रेल्वेच्या या नवीन बदलामुळे ही समस्या दूर होईल आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल.

एका रिपोर्टनुसार, आता प्रवासी त्यांच्या कन्फर्म तिकिटांची तारीख ऑनलाइन बदलू शकतील. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमची प्रवासाची तारीख बदलायची असेल, तर तुम्ही तुमचे तिकीट ऑनलाइन पुन्हा शेड्यूल करू शकता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एनडीटीव्हीला या मोठ्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार, ऑनलाइन कन्फर्म केलेल्या ट्रेन तिकिटाची प्रवास तारीख बदलण्यासाठी कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत. सध्याच्या प्रणालीमध्ये प्रवासाची तारीख बदलण्याची परवानगी नाही.
काय बदल होत आहेत?
समजा एखाद्या प्रवाशाला २५ ऑक्टोबर रोजी प्रवास करायचा आहे, परंतु काही कारणास्तव त्यांना त्यांची प्रवासाची तारीख बदलावी लागली. आता समजा त्यांना ३० ऑक्टोबर रोजी प्रवास करायचा आहे. यासाठी, प्रवासी त्यांच्या कन्फर्म केलेल्या तिकिटाची तारीख ऑनलाइन बदलू शकतो. ही नवीन प्रणाली जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे












