⁠ 

जनसंवाद आणि पत्रकारिता विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांचा माध्यम अभ्यास दौरा शहरातील जिल्हा माहिती कार्यालय, मल्टिमीडिया फिचर्स प्रा. लि., ९४.३ माय एफ. एम, आणि एमआयडीसीतील दैनिक देशदूत कार्यालयाल येथे आयोजित करण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांनी जनसंपर्क, जाहिरात, रेडिओ व वृत्तपत्र क्षेत्राविषयी माहिती जाणून घेतली.

विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील एम.एम.सी.जे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दि.२९ मार्च २०२२ रोजी जळगाव शहरातील जिल्हा माहिती कार्यालयास भेट देण्यात आली. यावेळी कार्यालयीन कर्मचारी विनोद पाटील यांनी माहिती कार्यालयाच्या रचनेसंदर्भात तसेच शासनाच्या जनंसपर्क विभागाची विस्तृतपणे माहिती दिली. त्यानंतर मल्टी मीडिया फिचर्स प्रा. लि. या जाहिरात संस्थेच्या कार्यालयाला भेट देवून जाहिरात निर्मितीची प्रक्रिया, जाहिरात संस्थेची कार्यप्रणाली, प्रसिध्दी मोहिम तसेच इव्हेंट मॅनेजमेंट संदर्भात जाणून घेतले. यावेळी सीईओ सुशिल नवाल, परितोष नवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुपार सत्रात शहरातील ९४.३ माय एफ. एम. केंद्राला भेट दिली. यावेळी आरजे वैष्णवी पाटील आणि केंद्रप्रमुख अदनान देशमुख यांनी रेडिओ कार्यक्रम निर्मिती व प्रसारण संदर्भात विद्याथ्र्यांना सखोल मार्गदर्शन केले. सायंकाळी एमआयडीसीतील दैनिक देशदूतच्या मुख्य कार्यालयास भेट देवून वृत्तपत्र निर्मितीची कार्यप्रणाली प्रत्यक्ष समजावून घेतली. यावेळी संपादक हेमंत अलोने यांनी वृत्तपत्र निर्मिती, दैनंदिन कामकाज, छपाई तंत्रज्ञान, वृत्तपत्र व्यवस्थापन व वृत्तपत्रांची वितरण प्रणाली याबाबत उदाहरणासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरप्रमुख डॉ. गोपी सोरडे, वितरण प्रमुख विजय महाजन, कार्मिक अधिकारी ईश्वर लोहार हे उपस्थित होते. हा अभ्यास दौरा विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर व प्रा. डॉ. विनोद निताळे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता.