शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

ऑगस्ट 10, 2026 10:22 PM

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व प्रज्ञावंत फाउंडेशनच्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचे केले कौतुक

जळगाव लाईव्ह न्यूज । आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करतात. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा, शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगावे आणि आयुष्यात मोठे यश संपादन करावे,” असा प्रेरणादायी संदेश जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिक्षणाच्या वाटेवर आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांनी राबविलेला शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम व ज्ञानदीप अभियान कौतुकास्पद व समाजाला दिशा देणारा आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. जळगाव येथील नियोजन भवनात सोमवारी (दि. १०) आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप सोहळ्यात ते बोलत होते.

sahityvatap
New Project 2

पत्रकार संघ व प्रज्ञावंत फाउंडेशनचे कार्य समाजाभिमुख : जिल्हाधिकारी रोहन घुगे

समाजातील गरजूंची नेमकी गरज ओळखून त्यांना मदतीचा हात देणे, हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख कार्य आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि प्रज्ञावंत फाउंडेशन गरजू विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहेत, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.शैक्षणिक साहित्य स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा, मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

ज्ञानदीप अभियानाचा शुभारंभ

प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव अंतर्गत ‘ज्ञानदीप’ अभियानाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन वर्षभर हे अभियान राबविण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पत्रकार संघांचे राज्य कार्यध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे यांनी आपल्या मनोगतातून केले.

“शैक्षणिक साहित्याची मदत… प्रत्येक गरजू विद्यार्थ्याच्या जीवनात ‘ज्ञानाचा दीप’ प्रज्वलित करण्याचा संकल्प” या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘ज्ञानदीप’ अभियान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देण्याबरोबरच समाजातील दातृत्वाची भावना अधिक बळकट करणारे ठरेल, असा विश्वासही प्रविण सपकाळे यांनी व्यक्त केला.

मान्यवरांच्या उपस्थितीत ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवणे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज काळे, जिल्हा प्रदूषण अधिकारी करण राजपूत यांच्यासह श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, ज्येष्ठ महिला संपादक शांता वाणी, संपादक मुकुंद नन्नावरे, करणी सेनेचे राज्य संघटक विलास पाटील, संघटनेचे विधी सल्लागार अॅड. दीपक सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार पाल्य तसेच गरजू व गुणवंत अशा ३०० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते दप्तर, वह्या, कंपास बॉक्स आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नगराज पाटील, भगवान मराठे, गोपाल सोनवणे, संतोष नवले, योगेश सैतवाल, नरेंद्र पाटील, प्रविण पाटील, चंदू खरे, विक्रम कापडणे, सतीश सैंदाणे, अबरार मिर्झा, गणेश रावळ आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

दात्यांच्या सहकार्यामुळे उपक्रमाला बळ

या उपक्रमासाठी जैन उद्योग समूहाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वह्या उपलब्ध करून देत मोलाचे योगदान दिले, तर रामलालजी मेमोरियल ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले. यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व दानशूर व्यक्ती व संस्थांनी दिलेल्या योगदानामुळे हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविता आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दाते, संस्था व हितचिंतकांचे विशेष आभार मानले. “गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील दातृत्वाची भावना अशीच पुढे आली, तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘ज्ञानदीप’ अभियानाच्या माध्यमातून वर्षभर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचा संकल्प असून, या कार्यासाठी समाजातील अधिकाधिक दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. शिक्षणाच्या वाटचालीत मिळालेली ही मदत निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ‘ज्ञानदीप’ अभियानाच्या माध्यमातून वर्षभर अशाच प्रकारे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now