जळगावातील महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; टँकरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

ऑगस्ट 5, 2026 11:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२६ । जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला असून भरधाव टँकरने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत ५५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अजिंठा चौक ते इच्छादेवी दरम्यानच्या मार्गावर आज बुधवारी सकाळी घडली. मंगला अर्जुन माळी (५५, रा. ज्ञानदेव नगर) असं मृत महिलेचं नाव असून अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग करून आकाशवाणी चौकात पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

mangla mali

मिळालेल्या माहितीनुसार, शहातील ज्ञानदेव नगरात राहणाऱ्या मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्या नेहमीप्रमाणे मुलगा भरतसोबत दुचाकीवरून पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अवजड टँकरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की मायलेक रस्त्यावर फेकले गेले. मंगला माळी या रस्त्यावर कोसळताच टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात पाहिलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ टँकरचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर टँकर अडवून चालकाला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. या वेळी मंगला माळी यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, घटनेनंतर नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त करत अनेक दिवसांपासून रस्ता खरडून ठेवण्यात आल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, याच धोकादायक परिस्थितीमुळे भीषण अपघात घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. टँकर चालकावर कठोर कारवाई करण्याबरोबरच महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now