⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भटक्या कुत्र्यांचा हल्ला : मुक्ताईनगरात सहा बकर्‍या दगावल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर शहरातील एका भागात भटक्या कुत्र्यांनी बकर्‍यांवर हल्ला चढवत सहा बकर्‍यांना ठार केल्याची घटना उघडीच आली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे दिसून आले आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये तीन दिवसांपूर्वीच कुत्र्यांच्या हल्ल्यात बकर्‍यांचा बळी गेला होता. यानंतर परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मात्र, यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. यानंतर रात्री पुन्हा एकदा कुत्र्यांमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. शहरातील वॉटर सप्लाय कार्यालयाच्या जवळच असलेल्या भागातील रहिवासी आसीफ मिस्तरी आणि आरीफ शेख आझम यांच्या मालकीच्या बकर्‍यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला. यात लचके तोडल्याने सहा बकर्‍यांनी प्राण सोडला असून चार बकर्‍या जखमी झाल्या आहेत. नगरपंचायतीकडे याआधी तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी यावर काहीही कार्यवाही न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उपस्थित होत आहेत.