⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दहावीच्या निकालाचे निकष जाहीर ; जाणून घ्या कसा लावणार निकाल?

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । राज्यातील दहावीच्या निकालाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे.

दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दहावी परीक्षेसदंर्भात शासननिर्णय काढला आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठं आव्हान निर्माण झालं होतं. ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभर सुरू होत. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं.

दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष 

वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण

दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण

नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण

दहावीचा निकाल कसा लावणार?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल.  शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.

i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.

ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.

iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीचे निकष जाहीर करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे.  ती म्हणजे गतवर्षी नववीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात आला होता. विद्यार्थ्यांची ही माहिती सरल पोर्टलवर उपलब्ध आहे.