जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध पक्षाचे नेते मंडळी मैदानात उतरले आहे. अशातच आज मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगावमध्ये येताहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचा रोड शो होणार असून यादरम्यान शहरातील काही रस्ते दुपारनंतर बंद राहणार आहे.

या मार्गावरून होणार रोड शो?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड-शो कोर्ट चौकातून सुरुवात होणार आहे. तर तो टॉवर, चित्रा चौक, शिवतीर्थ या मार्गावर सुमारे १७०० मीटरचा रोड-शो दुपारी ३ वाजेपासून सुरू होणार आहे. अडीच तास तो चालेल. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीसाठी या कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी ५०० पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या रोड-शोच्या नियोजनासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी सोमवारी दुपारी शिवतीर्थ ते रोड शोचा मार्गावर वाहनांचा ताफा फिरवून रंगीत तालिम करवून घेतली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बंदोबस्ताला तैनात असलेल्या सर्वांना एकत्रित बोलावून
मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात घ्यावयाच्या खबरदारीबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांचा रोड-शो कोर्ट चौकातून सुरुवात होणार आहे. नेहरूचौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे रोडशोची समाप्ती शिवतीर्थ मैदानाजवळ होईल.
बसेस वळवण्याचे नियोजन
शहरातून चोपडा यावलसाठी जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी महामंडळांच्या बसेस रॅलीच्या नेहमीच्या टॉवर चौकातून न जाता रिंगरोडमार्गे दूध संघाकडून वळवण्यात येणार आहे. आसोदा, भादली या गावाच्या बसेस खेडीमार्गे जुना आसोदा रस्त्यावरून वळवण्यात आल्या आहेत असे सांगण्यात आले.
येथे असेल नाकाबंदी
दुपारी २.३० पासून स्टेडीयम चौकात नाकाबंदी करण्यात येणार आहे. रिंगरोडमार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे. फुले मार्केटकडे जाण्यासाठी स्टेट बँकेकडून बालगंधर्व व बीजे मार्केटमार्गे जाता येईल. कोर्ट चौकातही नाकाबंदी करण्यात येणार आहे. रिंगरोडकडून येणारी वाहतूक नूतन मराठा कॉलेज समोरील गल्लीतून खान्देश कॉम्प्लेक्स रस्त्याने रेल्वेस्टेशनकडे वळवण्यात येईल. तिसरी नाकाबंदी ही शिवाजीनगर उड्डाणपुलावर करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांचे वाहन व इतर रॅली चित्रा चौक पार केल्यानंतर सोडण्यात येईल.











