श्रध्दा वालकर हत्या प्रकरण, आफताबला त्वरित फाशी द्या : छावा मराठा युवा महासंघ
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । श्रध्दा वालकर हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून क्रूरकर्मा आफताबला त्वरित फाशी द्यावी, अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाने महामहिम राष्ट्रपती यांचेकडे जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटिल यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटलं आहे की, पालघर येथील आफताब पुनवाला हा नराधम श्रद्धा वालकर या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. श्रद्धाने त्याच्याकडे लग्न करण्याविषयी आग्रह धरल्यामुळे क्रूरकर्मा आफताबने तिचे 35 तुकडे करून निर्घृणपणे हत्या केली व मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले . दिल्ली पोलिसांनी त्यांचे कौशल्य पणाला लावुन हा गुन्हा उघडकीस आणला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. श्रद्धाच्या क्रूरपणे झालेल्या हत्येमुळे देशभरातील युवतींमध्ये व महिलांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे व देशभरात संतापाची लाट पसरली आहे. भारतात दिवसेंदिवस युवती व महिलांना खोटी ओळख भासवत उच्च राहणीमान दाखवुन उच्च जीवनशैलीचे स्वप्न दाखवत प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचे प्रमाण खुप वाढलेले आहे. तसेच काही वर्षांपासुन महानगरांमध्ये व अलीकडे ग्रामीण भागात देखील युवती व महिला हरविल्याच्या घटनांची मोठया प्रमाणावर पोलिस स्टेशनला नोंद झालेली आहे. त्यापैकी बऱ्याच युवती व महिलांसोबत देखील अशाच प्रकारच्या घटना घडलेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही .
यासर्व बाबींचा विचार करता क्रूरकर्मा आफताब पुनवाला याने श्रध्दा वालकर या युवतीची निर्घृण हत्या केली , या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येऊन क्रूरकर्मा आफताबला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी . तसेच देशभरातील पोलिस स्टेशनमध्ये युवती व महिला हरविलेबाबत नोंद झालेल्या केसेसवर देखील गांभीर्याने उचित कार्यवाही करणेसंदर्भात संबंधितांना उचित निर्देश देण्यात यावे व भारतातील महिला व युवती बेपत्ता होण्यामागे काही षडयंत्र आहे किंवा कसे याविषयी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांचेकडे जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटिल यांच्यामार्फत निवेदन देऊन करण्यात आली . तसेच आफताब व याप्रकारे महिला व युवतींसाठी कर्दनकाळ असणाऱ्या प्रवृत्तींचा जाहिर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , किरण ठाकूर , उज्वल पाटिल , भीमराव सोनवणे , ज्ञानेश्वर मिस्तरी , आकाश निकम , प्रांजल नेमाडे , कृष्णा जमदाडे , सागर मोतीराडे , रवी सोनवणे आदी उपस्थित होते.