
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगराला वीजपुरवठा करणारी महावितरण कंपनीच्या एल टी लाइनवरील एबी केबल सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता जळाली. परिणामी या भागातील किमान २५० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने तब्बल १२ तास दुरुस्ती केल्यानंतर मंगळवारी दुपारी १ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.

वाल्मीक नगरला वीजपुरवठा करणाऱ्या एलटी लाइनवरील एबी केबल सोमवारी मध्यरात्री जळून तब्बल २५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतरही महावितरणने पर्यायी जोडणी केली नाही. मंगळवारी सकाळी देखील महावितरणचे ब्रेकडाऊनचे कंत्राट असलेल्या मे. चित्राक्षी एंटरप्रायझेस या ठेकेदाराने कामाला विलंब केला. यामुळे सकाळी १० वाजेनंतर दुरुस्तीचे काम सुरु होऊन या भागात दुपारी १ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.
वाल्मीक नगरला जामनेर रोडवरील पुरवठा होणारी एल टी लाईन गेल्या चार ते पाच महिन्यांत तीनवेळा जळाली. महावितरणने लोड वाढल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या भागात मात्र लोड का वाढतो? वीजचोरी का थांबत नाही? याबाबत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात. यामुळे दरमहा विजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांना त्रास सोसावा लागतो.











