⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

अहो आश्चर्य : भाजपचे गटनेते झाले शिंदेंच्या शिवसेनेचे शहर संघटक

जळगाव लाईव्ह न्युज : २० मार्च २०२३ : जळगाव शहर महानगरपालिच्या राजकारणात कधी काय होईल? हे कोणीच सांगू शकत नाही. आतापर्यंत नगरसेवक नक्की कोणत्या पक्षात आहेत हे नागरिकांना माहिती नव्हतं. मात्र आता एका पक्षाचे गटनेते दुसऱ्या पक्षाचे नेते झाले आहेत.

महाराष्ट्राच आणि जळगाव शहर महानगरपालिकेच राजकारण पाहायला गेलो तर बंडखोरांना या राजकारणामध्ये जास्त महत्व दिलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी महापालिकेची सत्ता शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वात 28 नगरसेवक भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत आले. यावेळी 28 नगरसेवकांना शिवसेनेत कोणताही प्रवेश दिला गेला नाही. उलट त्यांना भारतीय जनता पक्षातच ठेवण्यात आलं आणि भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या गटाने शिवसेनेला पाठिंबा देत आपला महापौर बसवला. महाराष्ट्रातही असाच काहीतरी घडलेल आपण पाहिलं.

या सगळ्यात ॲड. दिलीप पोकळे यांना भारतीय जनता पक्षाचे गटनेतेपद या बंडखोरी केलेल्या गटाने दिले. तर उपमहापौर हे कुलभूषण पाटील झाले.

पुढे जाऊन यातले 10 नगरसेवक हे पुन्हा भारतीय जनता पक्षात गेले आणि काही नगरसेवक हे शिंदे गटात गेले. शिवसेनेत फूट पडली तशीच महानगरपालिकेत देखील फूट पडली. भारतीय जनता पक्षातून आलेले नगरसेवक जे शिवसेनेत आले होते. ते पुढे जाऊन एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात गेले. मात्र वास्तविक पाहता यातला एकही नगरसेवक भारतीय जनता पक्षातून बाहेर गेलेला नाही. यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि गटनेते असलेले ॲड दिलीप पोकळे यांना शिंदे गटाने पद दिल्याने जळगाव शहरात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मात्र भारतीय जनता पक्षात असताना सुद्धा त्यांना पद कस देण्यात आलं ? याबाबत जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी चर्चा करायचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे महानगर प्रमुख दीपक सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ॲड.पोकळे यांची शिवसेनेच्या शहर संघटक नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्ही आता एकत्र काम करत असल्यामुळे याबाबत आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मात्र आता त्यांनी ताबडतोब आपल्या गटनेते पदाचा राजीनामा द्यायला हवा.

हे सगळे जरी असलं तरी देखील हा प्रश्न उरतोच की नक्की कोणता नगरसेवक या क्षणाला कोणत्या पक्षात आहे? अशावेळी ही झालेले नियुक्ती ही जळगावकरांची थट्टा आहे अशी जनभावना शहरात पाहायला मिळत आहे.

हर्षल मावळे युवासेना महानगर प्रमुख पदी नियुक्ती
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यांच्या आदेशानुसार जळगाव मनपाचे नगरसेवक ऍड. दिलीप पोकळे यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जळगाव शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच युवासेना महानगर प्रमुख पदी हर्षल मावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे