Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । भुसावळच्या रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलवर दारू, गुटखा, सिगरेट, बिड्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी उघडकीस आला. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी दुपारी ३ वाजता अचानक छापा टाकला असता हा प्रकार उघडीस आला.

फलाट क्रमांक २वर दीपाली चौधरी यांच्या नावाने परवाना असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉल हे प्रकार सुरू होते. तेथे मानसपुरे यांनी आरपीएफच्या मदतीने तपासणी केली. आरपीएफचे निरीक्षक आर.के.मीणा, वाणिज्य निरीक्षक नितीन राठोड, टीटीई प्रसाद धरणगावकर, आरोग्य निरीक्षक धरमवीर आदी उपस्थित हाेते.

दीपाली चौधरी यांच्या स्टॉलवर वरील साहित्य सापडले. यामुळे त्यांचे स्टॉल सील केले. परवाना देखील रद्द केला. रेल्वेकडे असलेली त्यांनी भरलेल्या सुरक्षा अमानातीमधून काही रक्कम कपात केली जाईल. एवढेच नव्हे तर त्यांना रेल्वेच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाणार असल्याची माहिती भुसावळचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसकर यांनी दिली आहे.












