जळगाव लाईव्ह न्यूज | १८ ऑगस्ट २०२३ | जळगावातील राजमल लखीचंद ग्रुपच्या विविध फर्मवर गुरुवारी सकाळी सक्तवसुली संचालनालय (ED) पथकाने छापे टाकले होते. दोन दिवस सुरू असलेली कारवाई शुक्रवारी संपली आहे. पथक रात्री मोठे दस्तऐवज आणि मुद्देमाल ताब्यात घेऊन बाहेर पडले. दरम्यान, कारवाईअंती पथकाने एका लोखंडी पत्री पेटीत काय जमा केले याचे गुपीत मात्र कायम आहे. पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
जळगाव जिल्ह्यातील माजी खा.ईश्वरलाल जैन आणि माजी आ.मनीष जैन यांचे जळगावसह राज्यभरात राजमल लखीचंद ज्वेलर्स नावाने फर्म आहे. तसेच त्यांचे इतर देखील काही शोरुम जळगावात आहेत. गुरुवारी सकाळी सक्तवसुली संचालनालय (ED) पथकाचे २० अधिकारी १० वाहनांनी जळगावात पोहचले. पथकाने एकच वेळी सर्व ठिकाणी छापे टाकले.
पथकाने आ.मनीष जैन यांच्यासह इतर काही कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली होती. पथकाकडून इन कॅमेरा सर्व कार्यवाही केली जात होती. पथकाने फर्मचे दस्तऐवज आणि मुद्देमाल देखील हस्तगत केला होता. शुक्रवारी रात्री उशिरा पथक बाहेर पडले. पथकाने एका लोखंडी पेटीत काही जप्त केले असून त्याची माहिती मात्र अधिकाऱ्यांनी देणे टाळले.