जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटीवरून पुण्यात हजारो एमपीएससी उमेदवारांनी आंदोलन केलं. याचवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पुण्यात विद्यार्थ्यांनी काढलेला मोर्चा हा सरकारच्या कारभारातील अपयश दाखवणारा असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील तरुण मोठ्या संख्येने आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी काही पालकांनी जमीन विकली, तर काहींनी कर्ज काढून शिक्षणाचा खर्च भागवला. अशा परिस्थितीत पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये वारंवार गैरप्रकार होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी, अशी मागणी खडसे यांनी केली. ‘सरकारला जनाची नाही, मनाची तरी असेल तर या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता तातडीने हालचाली कराव्यात,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला.
अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो उमेदवारांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली.






