परंपरेसोबत आधुनिक शेतीची कास धरा; पोळ्यानिमित्त जिल्हाधिकारी रोहन घुगेंचा शेतकऱ्यांना संदेश

सप्टेंबर 10, 2026 4:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बळीराजाचा उत्सव असलेला पोळा सण परंपरा जपत पारंपरिक श्रद्धेने व उत्साहात साजरा करतानाच शेतीला आधुनिकता आणि निसर्गपूरकतेची जोड देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

pola rohanghuge

पिलखेडा येथे कृषी विभाग व आत्मा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत पोळा सण साजरा केला तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी म्हणाले की, पारंपरिक शेती पद्धतींसोबतच नैसर्गिक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविणे हे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक आहे. कृषी विभाग व ‘आत्मा’च्या माध्यमातून राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन व योजनांचा लाभ पोहोचविण्यात येत आहे. पिलखेडा येथे सुरू करण्यात आलेले जैव निविष्ठा संसाधन केंद्र (BIRC) हे परिसरातील शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचे प्रमुख केंद्र ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जैव निविष्ठा संसाधन केंद्राची पाहणी करून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला. नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक जैविक घटक, जीवामृत, बीजामृत व वनस्पतीजन्य अर्क स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावेत, हा या केंद्राचा उद्देश आहे.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच कृषी विभागाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान पिलखेडा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर टाळून ‘विषमुक्त शेती करून क्लेशमुक्त जीवन जगण्याचा’ सामूहिक संकल्प केला.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, उप कृषी अधिकारी योगेश अत्रे, सरपंच रोहिणी साळुंखे, तेजल चौधरी, डॉ. अतुल चौधरी, राजेंद्र चौधरी, किशोर चौधरी, भावलाल साळुंखे, योगराज भालेराव, पंकज चौधरी, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सखी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now