जळगाव जिल्ह्यात तब्बल २३ ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन; बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी

सप्टेंबर 10, 2026 6:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात तब्बल २३ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात ५०० हून अधिक ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून, जळगाव जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

rojgar fair jpg webp

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या औचित्याने मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योग आणि विविध आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आहे. जिल्हा, तालुका तसेच औद्योगिक परिसरांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

उद्योग-आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती द्यावी

जळगाव जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उद्योग व आस्थापनांनी त्यांच्याकडील उपलब्ध रिक्त पदांची माहिती शासनाने दिलेल्या Google Form द्वारे किंवा QR कोड स्कॅन करून भरावी.

तसेच महास्वयम् रोजगार पोर्टलवर उद्योजकांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉगीन करून ‘Job Fair’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा क्र. २१ ते ४३ – रोजगार महाकुंभ महाराष्ट्र ०१ ते २३’ या पर्यायांतर्गत संबंधित रोजगार मेळाव्यासाठी उपलब्ध रिक्त पदांची मागणी अर्थात Vacancy Notification नोंदवावी.

अडचणी असल्यास हेल्पलाइनवर संपर्क

रोजगार मेळाव्यासाठी संकेतस्थळावर नवीन नोंदणी करताना किंवा रिक्त पदे अधिसूचित करताना काही अडचण आल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

उद्योग व आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती नोंदवावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now