जळगाव लाईव्ह न्यूज । प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अखेर शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी भुसावळच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह हातात धनुष्यबाण घेतले. या प्रवेशामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू असलेल्या अनिल चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांची बांधणी करत जोरदार तयारी केली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी रिंगणातून माघार घेतली होती.

निवडणुकीतून बाजूला झाल्यानंतर चौधरी यांनी आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत संकेत दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्याकडून आपल्याला संदेश मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच भविष्यात शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. अखेर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून चौधरी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
भुसावळमध्ये यापूर्वीपासूनच विविध राजकीय गटांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष सुरू आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मतदारसंघात स्थानिक राजकारण अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंत्री सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भुसावळमधील राजकीय स्पर्धेला आणखी धार आली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल चौधरी यांचा शिंदे गटातील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. चौधरी यांच्यासोबत असलेला स्थानिक समर्थकवर्ग आगामी काळात कोणती भूमिका घेतो, यावर भुसावळमधील राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका, संभाव्य राजकीय आघाड्या आणि विविध गटांची जुळवाजुळव या सर्वच बाबींवर चौधरींच्या प्रवेशाचा परिणाम होऊ शकतो.










