जळगावात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२३ । भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच पोलिस दलाच्या तुकड्यांनी मानवंदना दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी पोलिस दलाच्या तुकड्यांच्या कवायतीचे निरीक्षण केले. या संचलनात पोलीस मुख्यालय पुरुष/महिला, पोलीस मुख्यालय पुरुष, होमगार्ड पुरुष, एम. जे. कॉलेज NCC मुले, सेंट जोसेफ NCC बहिणाबाई युनिर्व्हसिटी NSS, आर. आर. विद्यालय RSP मुली, ओरियन इंग्लीश मिडीयम स्कुल स्काऊड व गाईड, आर. आर. विद्यालय गाईड मुली, सेंट.जोसेफ RSP मुले/मुली, श्रीराम माध्यमिक विद्यालय-RSP मुले, आर. आर. विद्यालय RSP मुले, श्रीराम माध्यमिक विद्यालय, RSP मुली, सेंट. जोसेफ गाईड मुली, सेंट. जोसेफ, स्काऊड मुले, स्टुडंट पोलीस कॅडेट आदि सहभागी झाले होते.

उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतांना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देणं देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरु आहे. त्या वाटचालीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. प्रजासत्ताक गणराज्याची संकल्पना स्वीकारुन आपण लोकशाहीच्या मार्गाने उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाला वर्तमानात प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सर्व प्रयत्नशील आहोत. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता आणि समतोल विकास या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरु आहे. देशाच्या या प्रगत वाटचालीमध्ये महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य हे देशातील आघाडीचे आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरु, लाला लजपतराय, लालबहादुर शास्त्री, सरोजनी नायडू, लोकशाही सारख्या उदात्त मुल्यांचा वारसा देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महान विभूतींच्या त्यागातून भारताच्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर भारत वर्षाची निर्मिती झाली. त्यांच्या आदर्श विचारांच्या प्रकाशवाटेत देशाने आतापर्यंत यशस्वीरित्या सर्व क्षेत्रात वाटचाल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची घोडदौड उत्तरोत्तर उन्नत होत आहे. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, शिल्पकला, नैसर्गिक साधनसंपत्ती, कृषी, औद्योगिक, पर्यटन या सगळ्यांसह वैचारिक चिंतनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच उज्वल वाटचाल होत रहावी, यासाठी आपण सगळे मिळून विकासाच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवू या. सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौहार्दपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होऊ या. परस्पर सहकार्याने आणि समन्वयातून आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची आणि आपल्या समाजाची सर्वांगिण प्रगती करण्यासाठी कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्र्यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या बॅण्डपथकाने देशभक्तीपर गीतांची धुन वाजविली.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, राजेंद्र वाघ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी मंदार पत्की, तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते त्यांच्या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहण करण्यात आले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही सकाळी ध्वजवंदन करण्यात आले. जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन राष्ट्रध्वजास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.