⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

RBI कडून रेपो दरात वाढ; आता तुमच्या गृहकर्जावरील EMI कितीने वाढणार? घ्या जाणून

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । देशभरात महागाईने कळस गाठला आहे. महागाईतुन सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून विविध पाऊले उचलली जात आहे. अशातच आज भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयानंतर कर्जावरील EMI आता पुन्हा एकदा महाग होणार आहे. रेपो रेट वाढल्यानंतर कर्जावरील ईएमआयमध्ये किती वाढ होईल असा सर्वांना प्रश्न पडला आहे. यापूर्वीच्या हप्त्या आणि नव्या हप्त्यात साधारणतः किती रुपयांची वाढ होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधुयात. या वाढीचा थेट परिणाम तुमच्या खिश्यावर कसा होतो ते समजून घेऊयात. Repo Rate Hike increase EMI on home loan?

आज आरबीआयने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली असून, त्यानंतर रेपो दर 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधीही 4 मे आणि 8 जून 2022 रोजी आरबीआयने रेपो रेटमध्ये एकूण 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती, त्यानंतर बँक ते हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी गृहकर्जावरील व्याजदर 0.90 टक्क्यांवरून 1.15 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत.

आजच्या रेपो दरात आरबीआयने 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचा काय परिणाम होतो ते पाहुयात. समजा तुम्ही 7.55% दराने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे घर कर्ज घेतले आहे. या कर्जावर तुम्हाला 24,260 रुपयांचा ईएमआय चुकता करावा लागतो. 20 वर्षात त्याला या दराने 28,22,304 रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजेच 30 लाख रुपयांच्या बदल्यात त्याला एकूण 58,22,304 रुपये भरावे लागतील.

आता कर्ज घेतल्यानंतर आरबीआयने रेपो दरात 0.50% वाढ केली. परिणामी बँकही व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ करेल. त्यामुळे बँक आता 7.55टक्क्यां ऐवजी 8.05 टक्के व्याज दर जाहीर करेल. म्हणजेच 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतल्यास त्याचा ईएमआय 25,187 रुपये राहील. याचा अर्थ तुमच्या ईएमआयपेक्षा 927 रुपये जास्त दर महिन्याला भरावे लागतील. 20 वर्षात एकूण 60 लाख 44 हजार 793 रुपये मोजावे लागतील. ही रक्कम तुमच्या कर्जफेड रक्कमेपेक्षा 2,22,489 ने अधिक असेल.

कर्जाचे हप्ते वाढणार म्हणजे नेमकं काय?
सर्वसाधारणपणे, बँकांकडून ईएमआय स्थिर ठेवला जातो. परंतु कर्जाचा कालावधी वाढवला जातो. बहुतेक RLLR कर्जदारांसाठी, RBI रेपो दर वाढीचा अर्थ कर्जाच्या कालावधीत वाढ असा आहे. रेपो दर वाढीचा व्याज दरावर परिणाम होतो. त्यामुळे रेपो दर वाढल्यानंतर तुमचा ईएमआय स्थिर असला तरी त्याच्या हप्त्यांच्या कालावधीमध्ये वाढ होते. थोडक्यात तुम्ही व्याजाची अधिक रक्कम बँकेला देता.