भुसावळात भल्यापहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ ! ६० सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती, अनेक जण ताब्यात..

जुलै 29, 2026 1:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२६ । भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राखण्यासाठी आणि रेल्वेच्या भंगार चोरी करणाऱ्यांवर कठोर वचक बसवण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभाग आणि RPF (रेल्वे सुरक्षा बल) यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी भरल्यापहाटे संपूर्ण परिसरात एक धडक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. या धडक कारवाईत ६० हून अधिक सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. तर २५ ते ३० संशयितांना ताब्यात घेण्यात असून, त्यांच्याकडून अवैध शस्त्रे आणि चोरीचे साहित्य हस्तगत केले आहे. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

BSLcombing

पोलीस आणि RPF च्या संयुक्त पथकांनी शहरासह उपविभागातील विविध भागात एकाचवेळी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली. यावेळी सुमारे १०० संशयितांची चौकशी करण्यात आली असून अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान रेल्वे पोलीस ठाण्यातील तीन नॉन-बेलेबल वॉरंट निकाली काढण्यात आले. यामध्ये सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट उर्फ श्याम काल्या उर्फ अब्दुल गफूर याला अटक करण्यात आली.

पंचशील नगर परिसरात शोहेब शाह शरीफ शाह याच्याकडून अवैध कोयता जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

चोरीची केबल आणि कटर जप्त

दीपनगर परिसरात कारवाई करत राजू सुरवाडे (रा. निंभोरा) याच्याकडून सुमारे ५० किलो वजनाची चोरीची केबल आणि केबल कटर जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

भंगार खरेदी करणाऱ्यावरही कारवाई

चोरीचे भंगार खरेदी करणारा शेख सरदार शेख बशीर याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्याच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मोठा पोलीस फौजफाटा तैनात

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) केदार बारबोले यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत २ प्रोबेशनरी DySP, ५ पोलीस अधिकारी, ३५ पोलीस कर्मचारी, RPF चे ३ अधिकारी व २३ कर्मचारी, तसेच जळगाव येथील RCP प्लाटून सहभागी झाले होते.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, भुसावळ उपविभागात गुन्हेगारीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविले जात असून, अशा धडक कॉम्बिंग ऑपरेशन्स पुढेही नियमितपणे सुरू राहणार आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now